उरणला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणाबरोबरच मोरबे धरणातीलही पाणीसाठा घटत चालल्याने हेटवणे धरणातून रानसईला केला जाणाऱ्या पाणीपुरवठय़ातही निम्म्याने घट झाली आहे. तर लघू पाठबंधारे विभागानेही पाणी कपातीचे आदेश दिल्याने येत्या मंगळवारपासून उरणमधील ग्रामपंचायती, उरण शहर आणि औद्योगिक विभागाला मंगळवार आणि शुक्रवार पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती एमआयडीसीने दिली आहे.    रानसई धरणाची क्षमता कमी असल्याने उरण तालुक्याला पाणीपुरवठा करण्यासाठी एमआयडीसीकडून मोरबे धरणातून नवी मुंबईला पाणी दिले जात होते. त्याच्या बदल्यात नवी मुंबईच्या पाणीपुरवठा विभागाकडून रानसई धरणासाठी हेटवणे धरणातून दररोज दहा दशलक्ष लिटर पाणी दिले जात होते. त्यासाठी एमआयडीसीकडून खास जलवाहिनीही टाकण्यात आलेली होती. मात्र मोरबे धरणातून पाणी पातळी कमी झाल्याने पाणीपुरवठय़ात घट करण्यात आलेली आहे. याचा परिणाम एमआयडीसीकडून मोरबे धरणातून नवी मुंबईला दिल्या जाणाऱ्या पाणीपुरवठय़ावरही झाला आहे. त्यामुळे हेटवणे धरणातून उरणसाठी होणारा पाणीपुरवठा दहा दशलक्ष लिटरवरून साडेचार दशलक्ष लिटरवर आला आहे. त्यामुळे पाणीपुरवठय़ात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याची अंमलबजावणी १५ मार्चपासूनच्या मंगळवार व शुक्रवार अशा आठवडय़ातील दोन दिवसांत करण्यात येणार आहे.