जेएनपीटी बंदरात रोजच्या ये-जा करणाऱ्या आठ हजार अवजड वाहनांमुळे तसेच तालुक्यातील वाढत्या प्रवासी व हलक्या वाहनांच्या ताणामुळे करळ पुलावर वाहतूक कोंडी होत असून, या कोंडीवर मार्ग काढण्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचआय)ने करळ फाटा येथे ५०० कोटी रुपये खर्चाचा मल्टीग्रेड सेप्रेटर(बहुमार्गी)उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या पुलाच्या कामाला सुरुवात म्हणून साफसफाई व जमिनीची तपासणीही सुरू करण्यात आली आहे. येत्या दोन वर्षांत हा पूल तयार होणार असल्याचा दावा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. या पुलाच्या उभारणीनंतर वाहतूक कोंडी तर दूर होईलच, शिवाय सिग्नल यंत्रणेविनाच वाहतूक नियंत्रित करण्यात येणार असल्याचाही दावा केला जात आहे.
जेएनपीटी बंदराच्या उभारणीच्या वेळी करळ फाटा येथे रेल्वेमार्गावर १९८९ म्हणजेच २५ वर्षांपूर्वी करळ पुलाची उभारणी करण्यात आलेली होती. त्या वेळी जेएनपीटी हे एकमेव बंदर होते. त्यामुळे वाहनांची संख्याही मर्यादित होती. मात्र काही वर्षांतच बंदरावरील उद्योगाची वाढ झाल्याने जेएनपीटीमध्ये एनएसआयसीटी (दुबई पोर्ट) हे खासगी बंदर उभारण्यात आले. त्यानंतर जीटीआय हे दुसरे बंदर उभारले गेले. सध्या एनएसआयसीटीमध्ये ३३० मीटर लांबीचे नवे बंदरही कार्यान्वित झाले आहे. त्यामुळे बंदराची कंटेनर हाताळणीची क्षमता वर्षांला ५० लाखांपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे या तिन्ही बंदरांना जोडणारा करळ पूल कमकुवत झाला आहे. तर नव्याने चौथ्या बंदराच्या उभारणीचे काम सुरू असून २०१९ पर्यंत या बंदराची उभारणी झाल्यावर बंदरातील कंटनेर हाताळणीची संख्या दुप्पट होऊन एक कोटीपर्यंत पोहचणार आहे. त्यामुळे सध्याच्या वाहन संख्येने अनेक पटीने वाढ होणार आहे. याचाच विचार करून जेएनपीटी, सिडको व भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाने करळ फाटय़ावर मल्टिग्रेड सेप्रेटरची उभारणी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्पाधिकारी प्रशांत फेगडे यांनी दिली आहे. या पुलाची उभारणी दोन वर्षांत करण्यात येणार असून त्यासाठी ५०० कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडीची समस्या दूर होणार असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. एका फुलाच्या आकाराचा असलेल्या करळ फाटय़ावरील या पुलाच्या उभारणीमुळे उरण व जेएनपीटी परिसराला एक झळालीही मिळणार आहे. असे असले तरी वाहतूक कोंडीची समस्या उड्डाणपुलांच्या उभारणीमुळे संपुष्टात येते ही कल्पना मुंबईतील ५६ उड्डाणपुलांनी खोटी ठरविलेली आहे. मात्र नव्या पुलाच्या उभारणीमुळे नागरिकांना प्रवासासाठी काहीसा दिलासा मिळण्याची आशा आहे.