दिनांक -४ मार्च २०१६

 आज मुंबई -नवी मुंबई आणि उपनगरामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने  सकाळीच कामासाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली .या पावसांच्या सरींमुळे हवेत गारवा पसरला होता. आज सकाळीच आकाशामध्ये काळे ढग जमा झाले होते तसेच काही प्रमाणात विजा देखील चमकत होत्या.त्यामुळे सर्वांच्याच नजरा आकाशाकडे लागल्या होत्या.
       पावसाच्या या अचानक हजेरीमुळे सकाळी ऑफिसला जाणाऱ्या चाकरमान्यांचा काही वेळ तरी  छत्री शोधण्यात नक्कीच गेला असेल.या पावसाचा कोणताही परिणाम रेल्वे वाहतुकीवर वर झाला नाही.सर्व मार्गावरील रेल्वे सुरळीत चालू होत्या त्यामुळे प्रवासात कोणतेही व्यत्यय आले नाही.
     या अवेळी पावसामुळे रायगड तसेच कोकणातील आंबा बागायतदार हताश झाले .आंब्याच्या झाडाला आलेला मोहोर अशा पावसाने गळून पडतो त्यामुळे अजून असा अवकाळी पाऊस पडू नये अशीच अपेक्षा रायगड तसेच कोकणातील आंबा बागायतदार करीत आहेत.