महाराष्ट्राचे आराध्यदैवत कुलस्वामीनी श्री एकविरा देवीच्या कार्ला गडावर आई एकविरेचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मात्र पालखी सोहळ्यापूर्वी पालखीच्या मानावरुन ठाण्याचे भाविक आणि पेण येथील पालखीचे मानकरी यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. त्यामुळे या सोहळ्याला गालबोट लागले.

आई एकविरेचा पालखी सोहळा पाहण्यासाठी तसेच देवीच्या दर्शनासाठी आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या विविध भागातून लाखो भाविक गडावर आले होते. पालखीचा याची देही याची डोळा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी सायंकाळी 5 पासून गर्दी केली होती. गडावर पालखीचा मान हा पुर्वापार पेणचे वास्कर व चौलचे आग्राव याचा आहे. परंतु, ठाण्याच्या काही भाविकांनी लाँबिंग करुन पालखीचा मान हिरावून घेण्याचा प्रयत्न केल्याने पावणे सात वाजता पेणकर व ठाणेकर यांच्यात जोरदार हाणामारी झाली. यात पेणकरांनी ठाणेकरांच्या तावडीतून पालखी ताब्यात घेत मिरवणुक सुरु केली. यामुळे चिडलेल्या ठाण्यातील भाविकांनी गडावर गोंधळ घालत स्टेजवर दगडफेक करत स्टेजची तोडफोड केली. तसेच आँर्केस्टाच्या कलाकारांवर हल्ला चढविला, तर काही कँमेर्‍यांची तोडफोड देखील केली व ट्रस्टच्या वस्तुंची मोडतोड केली. यामध्ये 10  लाखांचे नुकसान झाले. यामुळे काही काळ गडावर गोंधळ निर्माण झाला होता. काही भाविक यामध्ये जखमी झाले. या सर्व गोंधळात तासभर मिरवणुक काढत पेणकरांनी पालखी सोहळा पार पाडला.