आचरे किनारपट्टीचा समुद्रालगतचा बराचसा भाग तब्बल तीन ते चार फुटांनी खचल्याची आश्चर्यकारक घटना घडलीये. ही घटना घडण्याआठी समुद्रात स्फोट झाल्यासारखा आवाज आला होता अशी माहिती स्थानिक गावकर्‍यांनी दिलीये. या प्रकारामुळे किनार्‍यालगतच्या परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरे किनारपट्टीवर समुद्र खचला अशी बातमी वार्‍यासारखी पसरली.  किनार्‍यालगत किनारपट्टीचा बरचसा भाग तब्बल तीन ते चार फूट खचलाय. किनार्‍यापट्टीवर अचानकपणे चार फुटापर्यंतचा भाग समुद्रात वाहुन गेलाय. यापूर्वी कधीही अशी घटना घडली नसल्याचं इथले मच्छीमार आणि ग्रामस्थ सांगतायत.
गेल्या पंधरा दिवसांत सिंधुदुर्गातल्या समुद्रात झालेल्या स्फोटासारख्या आवाजानंतर हा प्रकार झाल्याचं गावकर्‍यांनी म्हटलंय. सर्वात पहिल्यांदा 7 एप्रिल रोजी सुमद्रात स्फोटासारखा मोठा आवाज झाला. या आवाजामुळे घरातील भांडी कोसळली. एकदा नाहीतर दोनदा हा आवाज ऐकू आला असं इथल्या मच्छीमारांचं म्हणणं आहे.
तर अरबी समुद्रात जमिनीच्या प्लेटमध्ये बदल झाल्यामुळे हा आवाज झाला असावा. एखाद्यावेळेस कुठे भूकंप झाला असेल तर त्यातून एक ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा जर समुद्रात पोहचली तर जमिनीचा पुर्नजन्म होतो. पण इथं जमीन वर आलेली नाही. कधीकधी जमीन जेव्हा वर येते तेव्हा ती समुद्रातील पाण्याला बाजूला सारते. त्यावेळी मोठा आवाज येतो अशी माहिती भूगर्भ शास्त्रज्ञ डॉ. मोहन प्रभू यांनी दिली. तसंच सध्या अरबी समुद्राखालील इंडियन प्लेटमध्ये जे काही बदल होत आहे. त्यामुळे येणार्‍या काळात मोठा भूकंपाचा धक्का बसण्याची शक्यता आहे. या भूकंपामुळे सुनामीही येऊ शकते अशी भीतीही प्रभू यांनी व्यक्त केली.
सध्या आचरेच्या समुद्रातही वेगाने लाटा किनार्‍यावर धडकात असून किनारपट्टीच्या सुरक्षिततेसाठी भूगर्भातल्या या बदलांचा वेळीच उलगडा झाला पाहिजे अशी अपेक्षा आचरेवासियानी व्यक्त केलीय.