भारताचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित असलेला ‘एमएस धोनी-द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. खुद्द महेंद्रसिंग धोनीनंच हा ट्रेलर लॉन्च केला आहे. 
या चित्रपटामध्ये सुशांतसिंग राजपूत मुख्य भूमिकेमध्ये असणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमुळेच आता वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या ट्रेलरमध्ये धोनीची भूमिका करत असलेला सुशांतसिंग राजपूत तीन खेळाडूंना टीममधून बाहेर काढण्याबाबत निवड समितीला सांगत आहे. हे तीन खेळाडू आता वनडे टीममध्ये फिट नाहीत असं सुशांतसिंग राजपूत या ट्रेलरमध्ये म्हणत आहे. 
निवड समितीच्या एका सदस्याला मात्र धोनीचं हे वक्तव्य पटत नाही. जे खेळाडू तुला प्रमोट करतात, त्यांनाच तुला बाहेरचा रस्ता दाखवायचा आहे का असा सवाल या सदस्यानं विचारल्याचं ट्रेलरमध्ये दिसत आहे. 
धोनीच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यावर हा सिनेमा बेतला आहे.  त्यामुळे या चित्रपटातल्या कथेबाबत धोनीची परवानगी नक्कीच घेण्यात आलेली असणार. खुद्द धोनीच या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. मग धोनीला कोणत्या तीन खेळाडूंना टीममधून बाहेर काढायचं होतं, याबाबतच्या चर्चांना मात्र उधाण आलं आहे.