सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नेरूळ-उरण रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे जुलै २0१७ पासून पहिल्या टप्प्यातील खारकोपरपर्यंत लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे. भूसंपादन व इतर कारणांमुळे रखडलेल्या त्यापुढील मार्गाचे काम पुढील सव्वा वर्षात पूर्ण होईल, असा विश्वास सिडकोच्या संबंधित विभागाने व्यक्त केला आहे.

सिडको व रेल्वे यांच्या संयुक्त सहकार्याने उभारण्यात येत असलेल्या या मार्गावर १0 स्थानके आहेत. तर या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च १७८२ कोटी रुपये इतका आहे. हा प्रस्ताव तयार केला तेव्हा या प्रकल्पाचा खर्च केवळ १४१२ कोटी रुपये इतका निर्धारित करण्यात आला होता. या संपूर्ण मार्गावर चार उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. त्यापैकील उलवे खाडीवरील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच या मार्गावरील सहाव्या क्रमांकाच्या खारकोपर स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे खारकोपरपर्यंत जुलै २0१७पासून लोकल सेवा सुरू करण्याच्या हलचाली सिडको प्रशासनाने सुरू केल्या आहेत.
खारकोपरनतंरच्या मार्गाचे काम भूसंपादन, खारफुटी, आणि इतर कारणांमुळे रखडले आहे. असे असले तरी या अडथळ्यावर मात करण्यासाठी सिडको व रेल्वे विभागाकडून प्रयास सुरू आहेत. यातील बहुतांशी अडथळे दूर झाले आहेत. उर्वरित प्रश्नही लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर नेरूळ-उरण रेल्वेमार्गाचे काम जलदगतीने होणे गरजेचे आहे. त्यानुसार सिडकोने कंबर कसली आहे. साधारण पुढील सव्वा वर्षात या मार्गाचे उर्वरित काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती सिडकोच्या संबंधित विभागाने ‘लोकमत’ला दिली.