विमानाचा शोध कसा लागला, विमान उडते कसे, विमान हवेत तरंगते कसे, त्यामागचे विज्ञान काय असा प्रश्न लहानांपासून सगळ्यांना पडलेला असतो. प्रत्यक्षात हे पाहता येणे शक्य नसले तरी पनवेलमध्ये एरोमॉडेलिंग शोच्या माध्यमातून हा शो सर्वांना पाहता येणार आहे. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलने निधी उपलब्ध करून हा शो विद्यार्थ्यांसाठी मोफत ठेवला आहे.
१७ डिसेंबर १९०३ रोजी अमेरिकेच्या राइट बंधूंनी विमानाचा शोध लावला. या दिवसाचे औचित्य साधून पनवेलच्या रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलने एरोमॉडेलिंग शो चे आयोजन केले आहे. पनवेलच्या कर्नाळा स्पोर्ट्‍स अकॅडमीत रविवारी, १७ डिसेंबर रोजी दुपारी तीन ते सहा या वेळेत हा शो होणार आहे. विद्यार्थ्यांना विमानातील विज्ञान समजून देण्याच्या उद्देशाने या शोचे आयोजन केले आहे. या शो मध्ये लाकूड व थर्माकोलमधून बनविलेल्या लहान-मोठ्या व विविध प्रकारच्या इले, मोटर व इंजिनवर उडणाऱ्या रेडिओ कंट्रोलने नियंत्रित करता येणाऱ्या आकर्षक मॉडेल्सची प्रात्यक्षिके व हवाई कसरती दाखविल्या जातील. तसेच, ट्रेनर विमान, पक्ष्याप्रमाणे हवेत तरंगणारी ग्लायडर उडती तबकडी, बॅनर टोइंग, हवाई पुष्पवृष्टी याशिवाय लूप, रोल, स्पिन यांसारख्या लढाऊ विमानाच्या थरारक कसरती पहायला मिळणार आहेत.
रेडिओ कंट्रोलने चॉपर विमानाच्या कसरती तसेच, पाठीवर इंजिनावर फिरणार पंखा घेऊन उंचावर उडणारा माणूस या शोमध्ये पहायला मिळेल. शो पाहण्यासाठी शाळेच्या गणवेशात आलेल्या विद्यार्थ्यांना पासची आवश्यकता नसेल.