कोन गावाजवळ असलेल्या होंडा मोटर्स कंपनीत कामगारांनी संघटना स्थापन केली म्हणून ८८ कामगारांना कामावरून कमी करण्यात आले होते. याच्या निषेधार्थ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनानंतर प्रशासन नमले. ७३ कामगारांना कामावर पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला.

कोन सावळा मार्गांवर होंडा मोटर्स कंपनीचे मोठे कार्यालय आहे. या ठिकाणी कंपनीचे मोठे गोदामही आहे. या कंपनीत परिसरातील तरुण मोठ्या संख्येने काम करतात. कंपनीत काम करणाऱ्या कामगारांनी काही दिवसांपूर्वी कंपनीत संघटना स्थापन करून कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली एकजूट केली. कंपनी प्रशासनाने याचा राग मनात धरून कंपनीतील ८८ कामगारांना कामावरून कमी केले.

प्रशासनाच्या या निर्णयावर दाद मागण्यासाठी कामगारांनी स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेतली असता शनिवारपासून ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी सकाळपासून प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली होंडा मोटर्सच्या आवारात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. साडेबारा वाजता प्रशासनाने काही कामगारांना कामावर घेण्याची कबुली दिली. मात्र स्थानिकांच्या जमिनी घेऊन कंपनी कोट्यवधींचा नफा मिळवते, मग कामगारांचा विचार का केला जात नाही, असा प्रश्न करत ठाकूर यांनी आंदोलन अधिक तीव्र केले. कोन सावळा मार्ग अडवून रस्त्यावर ठाण मांडण्यात आले. भाजपाच्या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने सुरू असलेल्या रास्ता रोकोमुळे वाहतूककोंडीला सुरुवात होताच घटनास्थळी तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी धाव घेतली. कामगारांना कामावर घेतल्याशिवाय आता माघार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे अखेर प्रशासनाने नमते घेत ८८ पैकी ७३ कामगारांना कामावर घेण्याचे आश्वासन दिले.