पनवेल, 18 डिसेंबर 2017 ः कोल्हीकोपर येथील एका तरूणाचा मृतदेह वळवली गावाजवळील तलावात आढळला आहे. या तरूणाचा मृत्यू तलावात बुडून झाला की त्याची हत्या झाली, याबाबत तर्कवितर्क काढले जात असून पोलिसांनी याप्रकरणी मृत तरूणाच्या पाच मित्रांना ताब्यात घेतले आहे.


नितीन नारायण नाईक (वय 30) असे मृत तरूणाचे नाव आहे. रविवारी तो कोन गावानजीक क्रीकेट खेळण्यासाठी गेला होता. त्यावेळी सामना जिंकल्यानंतर काही मित्रांनी त्याला पोपटी पार्टी करण्यासाठी वळवली तलावानजीक बोलावले. त्यानंतर तो परतलाच नाही. मित्रांच्या सांगण्यावरून नितीनच्या नातेवाईंकांनी वळवली तलावात काल रात्रीपासून शोध सुरू ठेवला होता. सोमवारी दुपारी त्याचा मृतदेह सापडला. मित्रांनी दिलेल्या माहितीवरून पार्टी सुरू असताना तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, वाचवण्यात अपयश आले. तर, कुटुंबियांनी दिलेल्या माहितीवरून त्याच घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पार्टी सुरू असताना मित्रांमध्ये बाचाबाची झाल्यामुळे त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.