उरण – तालुक्यातील रानसई धरणाची (Ransai Dam) पाणीपातळी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे एप्रिलपासून आठवडय़ातून दोन दिवसांची पाणीकपात सुरू करण्याचे संकेत उरणला पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे या वेळीही उरणमधील रहिवाशांना पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. रानसई धरणक्षेत्रात यंदा समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे उत्तम पाणीसाठा होता, मात्र उन्हामुळे होणारे बाष्पीभवन आणि मागणीतील वाढ विचारात घेता पावसाळा सुरू होईपर्यंत पाणीपुरवठा करता यावा यासाठी ही कपात करावी लागणार असल्याचे सांगण्यात येते.
उरणमधील २५ ग्रामपंचायती तसेच नौदल, उरण नगरपालिका, ओएनजीसी, वायुविद्युत केंद्र व येथील औद्योगिक विभागाला एमआयडीसीच्या रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. तर तालुक्यातील उर्वरित आठ गावांना पुनाडे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. दोन्ही धरणांतील पाणी साठवणूक क्षमता ही कमी होऊ लागली आहे. उरणमधील वाढत्या नागरीकरणामुळे व औद्योगिकीकरणामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे या दोन्ही धरणांच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. परंतु लोकप्रतिनिधींकडून या मागणीचा योग्य पाठपुरवा केला जात नाही.
रानसई धरणातील गाळामुळे धरणाची पाणी साठवणूक क्षमता ३ दशलक्ष लिटरने कमी झाली आहे. या समस्येवर उपाय म्हणून धरणातील गाळ काढणे किंवा धरणाची उंची वाढविणे हे दोन पर्याय देण्यात आले होते.