मला कोरोना तर झाला नाही ना ? असा प्रश्न सारखा मनात येतोय का?
एखादी शिकं आली तरी मनात सहज येऊन जाते , आपल्याला कोरोना तर झाला नाही ना ? अशी अवस्था आपल्या सर्वांची झाली आहे का ?
” मन चिंती ते वैरी न चिंती ” असं म्हणतात ते बरोबर आहे.
खरंच ना पाच ते सहा महिने झालेत , जिकडे बघू तिकडे फक्त आणि फक्त कोरोना, व्हाट्सअप – कोरोना, न्यूज – कोरोना, नातेवाईकांशी दूरध्वनी – कोरोना.
थोडी सर्दी झाली तरी ती सर्दी बरी होईपर्यंत हजार वेळा मनात कोरोनाचा विचार डोकावून जातोय , बरं दुसरा कोणी खोकत असेल तरी आपल्या मनात कोरोना थैमान घालू लागतो . खरं तर असं वाटणे स्वाभाविक आहे कारण मागचे सहा महिने आपला मेंदू व मनामध्ये कोरोना ऐवढा भरला गेला आहे की, दुसऱ्या गोष्टीला, नवीन माहितीला जागाच ऊरली नाही . असं वाटतय कोरोना सोडून दुसरा कुठला आजार आता उरला नाही . आपण शरीराने नाही पण मनाने मात्र कोरोनाग्रस्त झाल्यासारखे वाटायला लागले आहे.
बरं खरच हा आजार एवढा भीतीदायक आहे का ? की सारखा कोरोना हा विषय आपण चघळत असल्याने, त्याची आपणच महाप्रचंड भीती निर्माण केली आहे ? सर्वत्र असं दिसू लागले आहे की भीती मोठी झालीये आणि आजार छोटा झालाय .
खरंतर आजार होण्याची भीती कमी असावी, पण कोरोना झाल्यावर जो एखादा गुन्हा केल्याची किंवा खूप मोठी चूक झाल्याची किंवा खूप मोठे आपण पाप केल्याची भावना जी समाजात कोरोना रुग्णांनबद्दल दिसत आहे, ही भीती जास्त आहे. ह्या सर्व गोष्टीवर खरंच आपण विचार करायला हवाय.
आपलं शरीर जसं एखादि हानीकारक घटना , हल्ला किंवा संकटात ” Fight or Flight ” म्हणजे “लढा किंवा पळा ” अशी भूमिका घेत असते, त्याप्रमाणे आपल्याला कोरोना संकट काळात ठरवायचे आहे, ” Fight or Flight” कारण सध्याची सर्व परिस्थिती बघता कोरोना हे संकट फक्त काही महिन्यासाठी नसून ते थोडे दिर्घ काळ आपल्या सोबत राहणार आहे. मग अशी किती दिवस आपण ही भीतीची टांगती तलवार आपल्या मनावर घेऊन फिरणार आहोत . यावर ठोस असा पर्याय आपल्याला निवडावा लागेल. कारण आता कोरोना सोबतच आपल्याला जगायचं आहे .
आपण जर ” fight / लढा ” लढायचं ठरवलं असेल तर आपल्याला कोरोनाची भीती काढून टाकावी लागेल त्याच्या बद्दलचे अज्ञान काढून टाकावे लागेल. त्याच्याबद्दलची योग्य माहिती समाजात पसरवणे गरजेचे आहे आणि ह्या कोरोनाशी कसं लढायचं आहे याची रणनीती आपल्याला आखावी लागेल.
सध्यातरी आपल्याकडे लढण्यासाठी तीनच प्रभावी शस्त्र आहेत,
१) मास्क चा योग्य वापर
२) सोशल डिस्टंसिंग , सामाजिक आणि शारीरिक अंतर ठेवणे
३) स्वच्छता पाळणे
बरं फक्त लढाईची तयारी करून नाही चालणार ,ही कोरोना लढाई लढत असताना, शस्त्र हातात असतानाही कदाचित आपल्यावर जखमी होण्याची वेळ येऊ शकते , म्हणजे आपल्याला इन्फेक्शन देखील होऊ शकते आणि जर झालं तर आपण त्याच्याशी कसं लढायचं आणि लढाई कशी जिंकायची याची देखील रणनीती आखून ठेवने तितकेच गरजेचे आहे.
या कोरोना लढाईमध्ये आपलं मन आणि शरीर दोन्ही लढत आहेत. मनामध्ये जेव्हा जेव्हा कोरोनाची संशय ,भीती येते तेव्हा रामदास स्वामींचे मनाचे श्लोक मात्र आठवतात आणि मनाला स्थिती देऊन जातात.
जसे,
“मनी मानवा व्यर्थ चिंता वाहते ,
अकस्मात होणार होऊनि जाते ” !“देह दुःख ते सुख मानीत जावे ,
विवेके सदा स्वस्वरूपी भरावे “!“मना मानसी दुःख आणू नको रे ,
मना सर्वथा शोक चिंता नको रे”!
दुसरा पर्याय flight म्हणजे पळा , संकटाला घाबरून पळून जाणे ह्या पर्यायचा जर आपण विचार करत असू तर मग बसुया घरांमध्ये हातावर हात ठेवून, चिंताग्रस्त चेहरे बनवून आणि कोरोना लस येईल याची वाट बघत.
आता प्रत्येकाला पर्याय निवडायचा आहे . हे जे नकारार्थी भीतीदायक वातावरण घरी , समाजात पसरले आहे व पसरत आहे त्याचं आपणच एकत्र येऊन खंडन करू शकतो. चला तर मग मनात सकारात्मक विचार निर्माण करून ,आपण सर्वांनी मास्क चा योग्य वापर करून, सोशल डिस्टंसिंग ठेवून , स्वच्छतेचे पालन करून , कोरोनाच्या लढाईचा पण मनी धरून , लढाई सुरू करूया .
ही लढाई फक्त एका व्यक्तीची नसून आपण सर्वांनी एकत्र येऊन लढायचे आहे ,तेव्हा
“हे ईश्वरा सर्व जीवांना सुख, शांती समाधान, आनंद, प्रेम व आरोग्य लाभो”
ही विश्व प्रार्थना करून , आपला कोरोनाशी लढा चालू ठेवूयात
डॉ. कांचन सचिन कदम
कदम वेलनेस क्लिनिक
रोहा-रायगड