रोहा (निखिल दाते): संपूर्ण देशासह महाराष्ट्रावर सध्या कोव्हिडचे संकट आहे. प्रशासकिय तसेच व्यक्तीगत पातळीवर सध्या या कोव्हिडरुपी संकटाशी सर्व जण मुकाबला करत आहेत, हे करत असतांनाच श्रावण महिना सुरू झाल्यापासून सगळीकडे व्रतवैकल्य व उत्सवांना प्रारंभ झाला असला तरी कोव्हिड 19 च्या प्रचलित नियमाचे पालन करून हे सर्व उत्सव साजरे करायला लागत असल्यामुळे हौशी आणि उत्सवप्रिय रोहेकरांच्या आनंदावर विरजण पडत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. असे असले तरी प्रशासनाने कोव्हिडमुळे घातलेल्या सर्व संहिता, नियम, अटी,यांचे पालन करुन रोहेकर या वर्षी सर्व उत्सव साजरे करत असल्याचे पहायला मिळत आहे.

रोह्यात जन्माष्टमीच्या निमित्ताने दरवर्षी रंगणारा दहीहंडीचा थरार या वर्षी  कोव्हिडमुळे अनुभवता आला नसला तरी अनेकांनी आपल्या घरी जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्णाची मोठ्या भक्तिभावाने पूजाअर्चा केली.

जन्माष्टमी नंतर आता रोहेकरांना गणेशोत्सवाचे वेध लागले असून या गणेशोत्सवाची रोह्याला मोठी सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरा लाभली आहे रोह्यातील पुढची पिढी देखील सक्षमपणे ही परंपरा पूढे नेत असल्याचे सुखावह चित्र नेहमीच पहायला मिळते.

एक गाव एक सार्वजनिक गणेशोत्सव ही लोकमान्य टीळकांना अभिप्रेत असणारी संकल्पना रोहेकरांनी गेली 98 वर्ष प्रयत्नपूर्वक जतन केली आहे उत्सवाचे हे 99 वे वर्ष असून या वर्षी श्रीं ची मोठी मुर्ती, देखावा, सांस्कृतिक कार्यक्रम कोव्हिडमुळे करता येणे शक्य नसले तरीही गावाचे वैभव असलेल्या ह्या उत्सवाची गौरवशाली परंपरा  या वर्षीही सुरू राहणार आहे फक्त मोठ्या स्वरूपात कोणताही कार्यक्रम न करता या वर्षी कोव्हिडच्या प्रचलित नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा करण्याचा स्तुत्य निर्णय सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्ट ने घेतला असून उत्सव यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष श्री. राजेश काफरे व सहकारी नियोजन करत आहेत.

घरगुती गणेशोत्सवासाठीची लगबग देखील सुरू झाली असून या वर्षी दोन दिवस आधी येणारे चाकरमानीही गावात आधीच दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

गेले पाच महीने कोव्हिडमुळे रोहा बाजारपेठेत असलेली मरगळ देखील बापांच्या आगमनाने काही प्रमाणात तरी कमी होणार असून येणाऱ्या गणेशोत्सवासाठी रोह्याची बाजारपेठही सज्ज झाल्याचे चित्र आहे.

उत्सव साजरा करत असतांना कोव्हिडच्या प्रचलित नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने रोहेकरांना केले आहे.

रोह्यातील सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानने मांडली जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे कैफीयत

One reply on “जन्माष्टमी नंतर रोहेकरांना आता वेध गणेशोत्सवाचे”