रोह्यात कोरोना निधी नक्की कुठे वापरला? यासंबंधीची मागितली माहीती

रोहा (निखिल दाते): रोह्यातील युवकांची सक्रीय संघटना असलेल्या व आपल्या वैशिष्ट्यपुर्ण कार्यप्रणालीमुळे संपूर्ण जिल्ह्यात अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या आणि रायगड जिल्हा परिषदेचा सन 2019चा उत्कृष्ठ युवा मंडळ हा बहुमान  प्राप्त केलेल्या सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानतर्फे संस्थापक अध्यक्ष श्री. रोशन चाफेकर आणि सर्व सुराज्य सदस्यांच्या पुढाकारातून कोरोनानिधी संबंधी आणि उपजिल्हा रुग्णालय रोहे येथे रुग्णांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांसंबंधी रायगडच्या जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे पत्रव्यवहार करून कैफियत मांडण्यात आली आहे.

रोहे तालुक्यात सध्या कोरोनाचा फैलाव वेगाने सुरू आहेत अशातच उपजिल्हा रुग्णालय रोहे येथे रुग्णांना आवश्यक सोयीसुविधांची वानवा असल्याने रुग्णांची ससेहोलपट होतांना दिसते रुग्णांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी रोह्यातील विविध सामाजिक संस्था, दानशूर रोहेकर, यांनी पुढाकार घेत अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या पण मग शासनाकडून कोव्हिड साठी आलेला निधी रोह्यात नक्की कुठे वापरला गेला? का निधी आलाच नाही? यासंबंधी रोहेकरांच्या मनामध्ये संभ्रम आहे ते संभ्रमाचे मळभ दूर होण्यासाठी व रोह्यातील नागरिकांच्या वेदना प्रशासनापर्यंत पोचवण्यासाठी सुराज्यने स्तुत्य पुढाकार घेतला आहे.

सुरुवातीला सुराज्यनी रोहा तहसिलदार व प्रांताधिकारी यांच्याकडे उपरोक्त विषयासंबंधी पत्रव्यवहार केला होता मात्र यासंबंधीची माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक देऊ शकतात असे उत्तर त्यांच्याकडून मिळाल्यामुळे सुराज्यने जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे आपली कैफियत मांडली आहे.

सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानने जिल्हाधिकारी व जिल्हाशल्यचिकित्सक यांना दिलेल्या पत्रात कोरोनाच्या संकटात रोहा तालुक्यासाठी वापरलेल्या निधीची सविस्तर माहीती मागितली असून प्रशासन रोह्यातील रुग्णांच्या साध्या गरजा का पुर्ण करू शकत नाही? प्रशासनाकडून निधिची कमतरता का पडत आहे? रायगडच्या पालकमंत्र्यांपर्यंत सत्य परिस्थिती का जात नाही? कोव्हिड विशेष निधी मंजूर झाला आहे का? झाला असल्यास रोह्यासाठी किती कोव्हिड निधी आला व कुठे वापरला गेला? रोहा उपजिल्हा रुग्णालयात अनेक वस्तु व आवश्यक साधनसामुग्री नाही ह्याची जबाबदारी कोणाची? मार्च ते ऑगस्ट या पाच महिन्याच्या काळात उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे व्हेंटिलेटर का उपलब्ध होऊ शकला नाही? असे सर्वसामान्य रोहेकरांच्या मनात असलेले प्रश्न जिल्हा प्रशासनाकडे केले आहेत.

उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान कोरोनाकाळात व त्या आधीही कायमच आग्रही राहीलेली असून रुग्णांना शक्य ती सर्व सेवा पुरवण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे जिल्हा प्रशासनाने रोह्यातील या समस्यांची दखल घ्यावी व रोहेकरांच्या मनातील प्रश्नांना प्रशासनाने शक्य तितक्या लवकर समर्पक उत्तरे द्यावीत अशी आग्रही मागणी रोहेकर नागरिक करतांना दिसत आहेत.

जन्माष्टमी नंतर रोहेकरांना आता वेध गणेशोत्सवाचे