मुंबई पोलिसांच्या संशयास्पद कारवाईमुळे अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा अशी मागणी अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा परिवार, चाहते आणि बिहार सरकार करत होते. हि मागणी मान्य करण्यात आली असून यापुढे या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचे केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे. 

केंद्र सरकारचे वकील तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, बिहार सरकारची मागणी मान्य करण्यात आली असून ही केस सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे.

तर रियाचे वकील श्याम दिवान यांनी सांगितले की, मेहता यांनी जे काही सांगितले तो या सुनावणीचा विषय नाहीय. बिहारमध्ये नोंदवलेला एफआयआर हा कायद्यानुसार नाहीय, यामुळे न्यायालयाने या सर्व चौकशी प्रकरणावर स्थगिती आणण्याची मागणी दिवान यांनी केली आहे. 

बिहार पोलीस मुंबईला गेले आणि स्वत: चौकशी करायला लागले. त्यांच्या अधिकार क्षेत्रात ही बाब येत नाही. मुंबई पोलीस आधीपासून चौकशी करत आहेत. रियाविरोधात पाटनामध्ये दाखल झालेला गुन्हा मुंबईला हलवावा. मुंबई पोलिसांनी आतापर्यंत 59 जणांचे जबाब नोंदविले आहेत, असे दिवान यांनी सांगितले. 

यावर न्यायमूर्ती ऋषिकेश राय यांनी सांगितले की, सुशांत हुशार आणि गुणवत्तेचा कलाकार होता. त्याचा रहस्यमयी मृत्यू धक्का देणारा आहे. हा तपासाचा विषय आहे. जेव्हा कोणत्या हाय प्रोफाईल खासकरून बॉलिवूडच्या कलाकाराचा मृत्यू होतो तेव्हा प्रत्येकाचा वेगळा दृष्टीकोण असतो. सीबीआय चौकशीबाबत महाराष्ट्र सरकारने उत्तर द्यावे. आम्ही ठरवू की या प्रकरणी कोण तपास करेल. 

तर सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी सांगितले की, मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना सहकार्य करावे. यासाठी सूचना देण्याची मागणी केली. रियाच्या मागणीला आमचा विरोध आहे. रियाला या प्रकरणी कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळू नये, असेही त्यांनी न्यायालयात सांगितले. 

Raigad Corona News – रायगड कोरोना तपशील