सहा महीने संस्था बंद असल्याने संस्थाचालकांवर उपासमारीची पाळी

रोहा (निखिल दाते) : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन रायगड जिल्ह्यातील शासनमान्य कॉम्प्युटर टायपिंग व लघुलेखन संस्था या मार्चपासून बंद ठेवण्यात आल्या असून आज सहा महिन्यांनी देखील या संस्था सुरू करण्याची परवानगी मिळत नसल्याने संस्थाचालकांवर उपासमारीची पाळी आली आहे या संस्थांचे कामकाज चालू करण्याची लवकरात लवकर परवानगी मिळावी अशी आग्रही मागणी कॉम्प्युटर टायपिंग शिक्षण व कौशल्य विकास संस्था रायगडतर्फे राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, रायगडच्या पालकमंत्री ना. आदिती तटकरे, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात शासनमान्य कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षण देणाऱ्या साडेतीन हजारांहुन आधिक संस्था असून रायगड जिल्ह्यात शासनमान्य कॉम्प्युटर टायपिंग शिक्षण देणाऱ्या चाळीस संस्था आहेत, या संस्थांना शासनाकडुन कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान मिळत नाही .

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांस पत्र

या संस्थांच्या माध्यमातून कॉम्प्युटर टायपिंग प्रशिक्षण देण्याचे व कौशल्य विकास साधण्याचे काम नियमितपणे होत असून राज्यातील व रायगड जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी, कर्मचारी व नागरिकांनी या संस्थांमध्ये प्रशिक्षण साधून कॉम्प्युटर टायपिंगचे धडे घेतले आहेत.

गेले सहा महिने या संस्था पुर्णपणे बंद असल्यामुळे संस्थाचालकांचे कंबरडे मोडले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. आजवर या सर्व संस्थाचालकांनी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य केले असून आता राज्यात मिशन बिगिन अगेन सुरु असल्याने अनेक उद्योगव्यवसाय सुरू करण्यास शासनाने परवानगी दिलेली आहे त्याच धर्तीवर या प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास देखील शासनाने लवकरात लवकर परवानगी द्यावी शासनाचे सर्व प्रचलित नियम, अटी, शर्थीचे पालन करुन या संस्था चालवण्याची संस्थाचालकांची तयारी आहे अशी आग्रही मागणी कॉम्प्युटर टायपिंग शिक्षण व कौशल्य विकास संस्था रायगडचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकूर, सचिव राजेश श्रीवर्धनकर यांनी शासन व प्रशासनाकडे केली आहे.

राज्य सरकार देणार गरजू विद्यार्थ्यांना स्मार्टफोन