पनवेल: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला मारहाण करत तिला खांदेश्वर आणि मानसरोवर रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून बाहेर ढकलून देऊन तिची हत्या करणाऱ्या विशाल मनोज माने (२२) या पतीला पनवेल रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. १७ सप्टेंबरला सायंकाळी दोघे पती-पत्नी पनवेल येथून मानखुर्द येथे जाताना ही घटना घडली होती.

आरोपी विशाल हा मानखुर्द पुलाखाली फूटपाथवर असलेल्या झोपडपट्टीत राहण्यास असून त्याचा विवाह मानखुर्द भागातच राहणाऱ्या दिलीप सरवदे यांची मुलगी आरती हिच्यासोबत झाला होता. विशाल आरतीच्या चारित्र्यावर संशय घेत असे आणि ह्यातून त्यांच्यात नेहमी वाद होत होते. १७ सप्टेंबरला विशाल व आरती हे दोघे पनवेल येथे नातेवाईकांकडे गेले होते. सायंकाळी ६:३० वाजता पनवेलवरून मानखुर्द येथे परतण्यासाठी त्यांनी लोकल पकडली होती. या प्रवासादरम्यान विशालने आरतीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी लोकलमध्ये भांडण काढले. त्यानंतर त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीतच त्याने आरतीला खांदेश्वर आणि मानसरोवर स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून ढकलून दिले.

लोकल बेलापूर येथे थांबल्यानंतर, विशाल अंधारात रेल्वे रुळावरून चालत आरती पडलेल्या ठिकाणी पोहोचला. आरतीचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर त्याने ह्या घटनेची माहिती कुणालाच न देता आपले घर गाठले. दोन दिवसानंतर त्याने आरती धावत्या लोकलमधून खाली पडून तिचा मृत्यू झाल्याची माहिती आपल्या घरच्यांना दिली. त्यानंतर ह्या घटनेची कुणकुण वडिलांना लागल्यानंतर त्यांनी पनवेल रेल्वे पोलिस ठाण्यात धाव घेऊन आरतीचा मृतदेह ताब्यात घेतला.

राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व आगारांमधून पास, स्मार्ट कार्ड कार्यप्रणाली, नोंदणीकरण, नूतनीकरण प्रक्रिया सुरु