कमलाकर कांबळे

देशातील पहिले ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळनवी मुंबईत उभारले जात आहे, परंतु विविध कारणांमुळे विमानतळाची रखडपट्टी सुरू आहे. परिणामी, विमानाचे टेकऑफही लांबणीवर पडले आहे. असे असले, तरी आता २०२२ची नवीन डेडलाइन जाहीर करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र, हा मुहूर्तही चुकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कामाची सध्याची स्थिती पाहता, विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण होण्यासाठी २०२३ उजाडेल, असा जाणकारांचा अंदाज आहे.
१,१६० हेक्टर,
१६ कोटींचा खर्च
n रायगड जिल्ह्यातील पनवेलजवळ १,१६० हेक्टर जागेवर सुमारे सोळा हजार कोटी रुपये खर्चून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले जात आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील हे दुसरे अंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार आहे. तीन टप्प्यांत उभारल्या जाणाऱ्या या विमानतळाला २००८ मध्ये केंद्र सरकारची परवानगी मिळाली.
n त्यानंतर, चार वर्षांत म्हणजेच २०१२ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु भूसंपादन, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, तसेच आवश्यक असलेल्या विविध प्राधिकरणांच्या परवानग्या आदींसाठी विलंब झाला.
n १८ फेबु्वारी, २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रत्यक्ष कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानुसार, २०१९ मध्ये पहिले टेकऑफ होईल, असे जाहीर करण्यात आले होते, परंतु हा मुहूर्तही टळला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला आढावा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन महिन्यांपूर्वी विमानतळाच्या कामाचा आढावा घेतला.  कोणत्याही परिस्थितीत २०२१पर्यंत विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी सिडकोला दिले आहेत. त्यानुसार, सिडकोचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु या कालावधीत विमानतळाचा पहिला टप्पा पूर्ण होईल, याबाबत सिडकोही साशंक आहे. परंतु विविध कारणांमुळे हे मुहूर्त हुकले. सध्याच्या परिस्थितीत विमान उड्डाणाच्या नवीन तारखा जाहीर करण्यास सिडकोचे अधिकारी तयार नसल्याचे दिसून आले.

नामांतराचा राजकीय वाद
विमानतळ प्रकल्प पूर्ण होण्याअगोदरच त्याच्या नामांतराचा वाद निर्माण झाला आहे. राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचे सूतोवाच केले आहे, तर भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या वादात उडी घेत, दि.बा. पाटील यांच्या नावाला पसंती दिली आहे.
विमानतळाची प्रवासी क्षमता
नवी मुंबई विमानतळाचे काम तीन टप्प्यांत पूर्ण करण्याची योजना आहे. यातील पहिल्या टप्प्यात वर्षाला १ कोटी प्रवाशांची वाहतूक करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, तर दुसऱ्या टप्प्यात अडीच कोटी प्रवाशांची ने-आण करता येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात सहा कोटी प्रवाशांची वाहतूक करणे शक्य होणार आहे. त्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी होणार आहे.
अदानी समूहाकडे हस्तांतर सुरू
विमानतळाच्या उभारणीचा ठेका जीव्हीके या कंपनीला देण्यात आला होता. त्यानुसार, जीव्हीकेने विमानतळाच्या पहिल्या टप्प्यातील प्रकल्पपूर्व कामांना सुरुवातही केली होती. अदानी समूहाकडे विमानतळाच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे.

Source