पोलादपूर : प्रतिनिधी

तालुक्यातील कोंढवीतील फणसकोंड येथून प्रथम गांजवणे, खडपी, चोळई, धामणदिवी, दत्तवाडी, खडकवणे, गोलदरा व तळयाची वाडी या आठ गावांचे आराध्य ग्रामदैवत आठगांव कोंढवी भैरवनाथ मंदिराच्या लगत नवीन भव्य पाषाणमंदिर बांधण्याचा संकल्प हाती घेतल्यानंतर याकामी पाण्याची साठवण टाकी खणण्यासाठी खड्डयातील माती उपसण्यात आली. मातीच्या ढिगार्‍यामध्ये 15 अश्मयुगीन पाषाण मुर्ती आढळून आल्य आहेत. तालुक्यात या घटनेमुळे भाविकांमध्ये विशेष कुतूहल निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, पोलादपूर तालुक्यातील आठगांव कोंढवी भैरवनाथ मंदिराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासोबतच तीर्थक्षेत्र वा यात्रास्थळाचा दर्जा द्यावा, अशी मागणी देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी राज्य सरकारकडे केली आहे. एकनाथ गायकवाड यांनी सांगितले की, या जागृत आठगांव भैरवनाथ देवस्थानाची प्रचिती या छत्रछायेतील भाविकांनी नेहमीच घेतली असताना अन्यत्र सर्वदूर पसरलेल्या भाविकांपर्यंत प्रसिध्दी होऊन त्यांना या देऊळमाळावर येण्याची व्यवस्था होण्यासाठी या देवस्थानापर्यंत रस्ता, पाणी, वीज, मंदिराचे सभागृह आणि गाभारा यांचे नूतनीकरण करून भाविकांना येथे देवदर्शनासोबतच सोयीसुविधाही देण्याचा मानस असल्याने सुमारे दीड कोटी रूपये अंदाजे खर्चाचे पाषाणाचे नवीन मंदिरासाठी बांधकाम करण्याचा संकल्प केल्यानुसार गेल्या आठ ते 15 दिवसांपासून बांधकामाला सुरूवात झाली आहे. या बांधकामासाठी पाणी साठविण्याकामी मंदिराच्या डोंगर उताराला एक खड्डा खणण्यात आला असता नरसिंहमंदिर कंन्स्ट्रक्शन लातूर येथील बांधकाम व्यावसायिकांच्या कामगारांना या खड्डयातील मातीचा उपसा केलेल्या ढिगार्‍यामध्ये काही पाषाणाच्या मुर्ती आढळून आल्याने कामगारांनी त्या वेचून मंदिरासमोरील प्रांगणात मांडल्या.

Source