कामांची रखडपट्टी; नागरिकांकडून संताप

पनवेल : करोनापूर्वी पालिकेने शहरातील काही महत्त्वाच्या रस्त्यांची कामे सुरू केली होते. करोनामुळे मजुरांचा तुडवडा व इतर कारणांमुळे ही कामे रखडली असून वर्ष झाले तरी पूर्ण होत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कोहिनूर टेक्निकलर्पयचा रस्ता आणि अमरधाम स्मशानभूमी ते सावरकर चौकापर्यंतच्या रस्त्याची कामे संथगतीने सुरू आहेत.

पनवेल पालिकेने शहरातील अकरा कोटी रुपयांची रस्त्याची कामे हाती घेतली आहेत.  गेल्या वर्षी मार्च महिन्यात या कामांना सुरुवात करण्यात आली होती. मात्र करोना संकटामुळे या कामांवर मोठा परिणाम झाला.  छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते कोहिनूर टेक्निकलपर्यंतच्या रस्त्यासाठी तीन कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून १२ मीटर रुंद करण्यात येणार आहे. मात्र अकरा महिन्यांनंतर या रस्त्याचे निम्मे कामही झालेले नाही. सोमवारी एका कार्यक्रमानिमित्त राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर येथील सुरुची हॉटेलमध्ये येणार होते. मात्र हा रस्ता खोदून ठेवल्याने त्यांचे वाहन त्या ठिकाणी कसे जाणार म्हणून रातोरात खोदलेल्या रस्त्यावर खडी पसरविण्यात आली. अशीच स्थिती अमरधाम स्मशानभूमी ते सावरकर चौक यादरम्यानच्या रस्त्याची आहे. या रस्त्यालगत पनवेलचे सत्र न्यायालय आहे. हजारो दावे या न्यायालयात सुरू आहेत. मुंबई व राज्यातून विविध विधिज्ञ, न्यायाधीश या न्यायालयाच्या कामास्तव येथे येतात. मंगळवारी येथे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम हे येत असल्याने सुरक्षेसाठी वाहतूक पोलीस तैनात केले होते. एरवी येथे रस्त्याच्या कामामुळे रोजची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मात्र पोलीस येत नाहीत, असा संताप वाहनचालकांनी व्यक्त केला आहे. अमरधाम ते सावरकर चौक हा रस्ता काँक्रीटचा बनविण्यात येणार असून यासाठी ९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मात्र अनेक ठिकाणी रस्ता अरुंदच राहिला आहे. रस्त्याच्या या रखडपट्टीमुळे यापूर्वी एका महिलेचा बळी गेला आहे. असे असताना वर्षांनुवर्षे शहरातील रस्ते खोदकाम करून ठेवण्यात आले आहेत.

करोना संसर्गकाळात थांबलेल्या कामांना जलदगतीने पूर्ण करणे हेच उद्दिष्ट आहे. नागरिकांची गैरसोय होऊ  नये यासाठी मी स्वत: आणि शहर अभियंता यांनी काम सुरू असलेल्या ठिकाणी भेट दिली आहे. लवकर कामे पूर्ण होत रस्ते सर्वासाठी खुले होतील.

तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पनवेल पालिका

पनवेल शहरातील मुख्य प्रवेशव्दारांपैकी कोहिनूर टेक्निकलचा मार्ग हा एक असून सर्वाधिक वापर नागरिक या मार्गाचा करतात. मागील अनेक महिन्यांपासून सोसायटीच्या या मुख्य रस्त्याचे काम होत नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. पनवेल पालिका प्रशासन हे रस्ते लवकर पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे.

मदन कोळी, माजी नगराध्यक्ष, पनवेल