पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील अगदी ग्रामीण स्तरापर्यंतची आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचा ध्यास घेतला आहे. अनेक वर्षांपासून मंजूर झालेल्या आरोग्य केंद्रांना प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाही प्रलंबितच होती. मात्र पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या विषयाबाबत गांभीर्याने पावले उचलत आरोग्य केंद्रांसाठी शासकीय जमिनी देण्याची कार्यवाही अत्यंत तत्परतेने सुरू केली आहे.

               त्याचबरोबर आरोग्य केंद्रांसाठी आवश्यक असलेल्या जागांची योग्य निवड व पाहणी करून आरोग्य केंद्रे कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही सुरू करण्याबाबतीतही त्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर उरण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, पिरकोन व आवरे या इमारतीच्या बांधकामासाठी शासकीय जमिनीची मागणी होती. याबाबत पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी संबंधितांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार मौजे पिरकोन ता.उरण, जि. रायगड येथील स.नं.556 क्षेत्र, 499.7 ही जमीन व मौजे आवरे ता.उरण जि. रायगड येथील स.नं.1/1/ब क्षेत्र  0-07-00 हे.आर.ही जमीन भोगाधिकार मूल्यरहित व महसूल मुक्त किंमतीने ही शासकीय जमीन जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, अलिबाग यांच्याकडे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, पिरकोन करिता हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी नुकतेच जारी केले आहेत.

उरण तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने हा लोकोपयोगी निर्णय घेण्यात आला आहे.