खालापूर : कर्जत जलसंपदा विभागाने नुकताच आयआरबी कंपनीला पाणी चोरी प्रकरणी तब्बल ७५ लाख दंड ठोठावला आहे. जलसंपदा विभागाच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून एक्स्प्रेस वेच्या स्थापनेपासून आजतागायतपर्यंत अनधिकृत पाणी उपसा करून पाण्याचा कर न भरल्याने उपसा पंप सील करण्यात आले आहे.
मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर पाताळगंगा नदीपात्रातून दांड वाडी निंबोडे गावाच्या हद्दीतून किलोमीटर २७,५०० दरम्यान पंप हाऊस उभारून पाइपद्वारे पाण्याचा उपसा करण्यात येत असून या पाण्याचा व्यवसायासाठी वापर होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने कर्जत जलसंपदा विभागाचे उप अभियंते दाभिरे, गायकवाड यांनी छापा टाकून आयआरबीकडून सुरू असलेले पाणी उपसा करण्यासाठीचे पंप हाऊस सील केले. यावेळी पंचनामा करून याबाबत आयआरबीला खुलासा करण्याचे पत्र देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडून बीओटी तत्त्वावर एक्स्प्रेस वे घेतल्यापासून हे पाणी उपसा अनधिकृत सुरू असल्याने जलसंपदा विभागाने ही धडक कारवाई केल्याने जलसंपदा विभागाचे सर्वांकडून कौतुक करण्यात येत आहे. पाताळगंगा नदीपात्रातून अशा प्रकारे व्यवसायासाठी पाण्याची चोरी होणे ही गंभीर बाब असल्याने आयआरबीच्या एकूणच कारभारावर स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर कारवाई केल्यानंतर आयआरबीकडून पाणी उपसा करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून अर्ज करण्यात आला आहे.