खालापूर : राज्यात भीषण पाणीटंचाई असताना रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील नाढळ गावाच्या हद्दीतील तलाव बुजविण्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. चौकजवळील लोधिवली ग्रामपंचायत हद्दीतील असणाऱ्या या पाझर तलावात मातीचा भराव टाकण्याचे काम ग्रामपंचायतीने हाणून पाडले असून, जिल्हा परिषदेच्या मालकीच्या या तलावात अनधिकृत काम करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी होत असताना कर्जत लघु पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
रायगड जिल्ह्याच्या कर्जत, खालापूर या भागात मुंबईतील धनिकांची फार्महाऊस मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातच जमिनींना सोन्याचा भाव आल्याने स्थानिक दलालांना हाताशी धरून मोक्याच्या आणि जलसाठ्यालगतच्या जमिनी ताब्यात घेण्याच्या घटना घडत आहेत. खालापूर तालुक्याच्या लोधिवली ग्रामपंचायतीच्या नाढळ गावाच्या हद्दीत जवळपास ४० एकरांचा नाढळ पाझर तलाव आहे. अलीकडे या तलावाच्या मजबुतीकरणासाठी जिल्हा परिषदेने कोट्यवधी रु पये खर्च केले असून, या तलावाच्या मागील बाजूस तलावालगत असणाऱ्या मुंबईतील धनिकांनी तलावात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दगडमातीचा भराव केल्याने तलावाचे पाणी साठवणुकीचे क्षेत्र अंदाजे चार एकर कमी करण्यात आले आहे. पुन्हा एकदा हे काम रात्रंदिवस सुरू केल्याचे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य तर ग्रामसेवक यांच्या पाहणी करताना लक्षात आले. या तलावाच्या पाण्यावर सहा ते सात गाव-वाड्यांच्या परिसरातील पाणी योजना आहेत. शेतकरीवर्ग तर आदिवासी बांधव असल्याने ही गंभीर बाब ग्रामपंचायतीने तत्काळ तहसीलदारांच्या निदर्शनात आणून दिली. यावेळी सरपंच गंगू कातकरी, उपसरपंच गणपत ठाकू, सदस्य सुभाष प्रबलकर, किशोर निकाळजे, ग्रामस्थ मधुकर पारधी, रवींद्र भुईकोट, ग्रामसेविका रश्मी शिंदे आदी उपस्थित होते.
जेसीबी, फोकलेन मशिन, डम्परच्या साहाय्याने मातीचे उत्खनन करून उत्खन