रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात रविवार सायंकाळपासून तांत्रिक अडचणीमुळे गेल्या २४ तासांतील करोना चाचणी अहवाल प्राप्त झालेले नाहीत, असे जिल्हा शासकीय रुग्णालयाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४८४ इतकी असून कालपासून कोविडड केअर सेंटर समाजकल्याण रत्नागिरी येथून ७ रुग्णांना तर जिल्हा कोविड रुग्णालय, रत्नागिरी येथून २ असे एकूण ९ रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ३५८ झाली आहे. जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ७३ टक्के आहे.

वाचा: ‘फायटर’ धनंजय मुंडे ११ दिवसांत करोनाला हरवून परतले घरी

रत्नागिरीत आज दोन करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये शिरगाव ( ता. रत्नागिरी ) येथील पुरुष रुग्णाला (वय ६५) किडनी व मधुमेहाचा आजार होता तसेच काडवली संगमेश्वर येथील महिला रुग्ण (वय ४२) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन्ही रुग्णांना मुंबई प्रवासाचा इतिहास होता. हे दोन रुग्ण दगावल्याने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २१ झाली आहे. सध्या रुग्णालयात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १०६ आहे. यात पुन्हा दाखल केलेल्या रुग्णाचा समावेश आहे.

आज सायंकाळची स्थिती अशी

एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – ४८४

बरे झालेले रुग्ण – ३५८

एकूण मृत्यू – २१

उपचार सुरू असलेले रुग्ण – १०५+ १

(यात एक रुग्ण पुन्हा भरती झालेला आहे)

कंटेनमेंट झोन: जिल्ह्यात सध्या ४४ ॲक्टिव्ह कंटेनमेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात १४ गावांमध्ये, गुहागर तालुक्यामध्ये १, संगमेश्वर तालुक्यात १, दापोलीमध्ये ६ गावांमध्ये, खेडमध्ये ८ गावांमध्ये, लांजा तालुक्यात ५, चिपळूण तालुक्यात ८ गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात एका गावामध्ये कंटेनमेंट झोन आहेत.

संस्थात्मक विलगीकरण: शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – २१, कोविड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – १, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – १, कोविड केअर सेंटर घरडा इन्स्टिट्युट, लवेल, खेड – ४, कोविड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली – १६, असे एकूण ४३ करोना सदृष्य लक्षणे असलेले रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात दाखल आहेत.

होम क्वारंटाइन: मुंबईसह एम. एम. आर. क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाइन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाइन खाली असणाऱ्यांची संख्या ३३ हजार ६४६ इतकी आहे.

७ हजारपेक्षा जास्त अहवाल निगेटिव्ह

जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण ८ हजार ३८४ नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी ७ हजार ९८५ तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील ४८४ अहवाल पॉझिटिव्ह आले असून ७ हजार ४८६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून ३९९ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. ३९९ प्रलंबित अहवालांमध्ये ४ अहवाल कोल्हापूर येथे, १६२ अहवाल मिरज आणि २३३ अहवाल रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत. परराज्यातून व अन्य जिल्ह्यांतून रत्नागिरी जिल्ह्यात १९ जूनपर्यंत एकूण १ लाख ४७ हजार १८२ व्यक्ती दाखल झाल्या आहेत तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या ७४ हजार ३४ इतकी आहे.

Source