पाऊस मनामनातला – सौ.नेहा नितीन दळवी

प्रत्येकाच्या मनातला पाऊस हा वेगवेगळा असू शकतो… पावसाची रूपं सुद्धा वेगवेगळीच… कधी आठवणीतला पाऊस तर कधी नकोसा वाटणारा पाऊस तर कधी हवाहवासा वाटणारा पाऊस…माझ्या नजरेतला पाऊस हा असा आहे ..?

पाऊस-मनामनातला
पाऊस मनामनातला

पावसाच्या सरी बघते , आणि आठवणीत खूप रमून जायला होते ,
कधी शाळेतील पावसाळी खेळ तर कधी कॉलेजमधील पावसाळी सहल आठवते ..

रेनकोट कधी आवडलाच नाही , रंगीबेरंगी छत्री मात्र आणायचो,
कागदाच्या होड्या पाण्यात सोडायचो, तर कधी डबक्यात पण उड्या मारायचो..

शाळेत जाताना पाऊस आणि चिखलाने तर पूर्ण माखून जायचो,
मुद्दाम स्वतःची छत्री लपवून मैत्रिणीच्या छत्रीत हुंदडायचो…

आणि तेव्हा तिथे असतो…
मी, मैत्रिणी आणि तो बरसणारा खट्याळ पाऊस…।।

कधी कधी बिनसते त्याचे ही , मनसोक्त कोसळत असतो ,
तर कधी तहानलेल्या जमिनीला अलगद सरींनी हसवत असतो..

अमानुष अस्तित्व जाणवते त्याचे जेव्हा संसार उद्वस्थ होतात ,
आणि नकोसा तो वाटून डोळ्यात अश्रू दाटून येतात..

आणि तेव्हा तिथे असतो…
मी , हतबल जनता आणि तो निर्दयी कोसळणारा पाऊस…।।

पहिला रिमझिम पाऊस बघताना, सुगंध मोहून टाकतो मातीचा,
हलकासा तो बेधुंद गारवा अलगद ठाव घेतो मनाचा..

खुणावतो हिरवागार निसर्ग जेव्हा तो हिरव्या शालूत सजलेला दिसतो ,
धुक्यातली वाट असते आणि सहवास त्याचा असतो ,

गॅलरी मध्ये जेव्हा गरमागरम भजी आणि वाफाळलेला चहा येतो ,
आणि तेव्हा पाऊस जास्तच हवाहवासा वाटतो कारण सोबतीला तो असतो …

आणि मग तिथे असतो ,
मी , तो आणि अर्थातच रोमॅंटिक पाऊस …???

neha-dalvi
सौ. नेहा नितीन दळवी

उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ | Action Speak Louder than Words In Marathi