मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छीमारांना खराब हवामानाचा फटका बसला असून, मुसळधार पाऊस व वादळी वार्‍यामुळे सुमारे ३०० बोटी मुरूड तालुक्यातील आगरदांडा बंदरात आसरा घेण्यास आल्या आहेत. यामध्ये स्थानिक तसेच परराज्यांतील बोटींचाही समावेश आहे.

रायगड जिल्ह्यात सलग तीन दिवस पडणारा पाऊस आणि वादळी पावसाचा फटका मच्छीमारांना बसला असून, आगरदांडा बंदरात मुरूड व श्रीवर्धन तालुक्यासह रत्नागिरी तसेच गुजरात, कर्नाटक आदी भागातील सुमारे दोनशे बोटींनी आसरा घेतला आहे. त्यामुळे येथे सर्वत्र बोटीच बोटी दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून समुद्रात निर्माण होणार्‍या वादळी हवामानामुळे मच्छिमारांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. नारळी पौर्णिमेच्या दरम्यानही खराब हवामानामुळे बोटी माघारी परतल्या होत्या.

किनारी थांबलेल्या बोटींची प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत असून, त्यांना आवश्यक असणारा पाणीपुरवठा त्याचप्रमाणे डिझेल व रेशनिंग सामान पुरवण्याबाबत लक्ष दिले जात आहे.
याबाबत बोलताना रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी सांगितले की, वातावरणात बदल होऊन खोल समुद्रात जोरदार पाऊस, उंच लाटा व वेगाने वाहणारे वारे यामुळे मासळी पकडण्यास मोठी समस्या निर्माण झाली होती. धोका वाटत असल्याने अनेक बोटी आगरदांडा व दिघी बंदर सुरक्षित असल्याने या ठिकाणी थांबल्या आहेत.

मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी सुरेंद्र गावडे यांच्याशी संपर्क साधला असता आगरदांडा बंदरात गुजरात, गोवा आदी ठिकाणहून ३०० हून अधिक बोटी आश्रयासाठी थांबल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे रेवदंडा व रेवस खाडीत सुद्धा अनेक बोटी स्थिरावल्याचे ते म्हणाले. खराब हवामानामुळे ज्या बोटी किनार्‍यावर उभ्या आहेत त्यावरील खलाशांना औषध, पाणी व तत्सम मदत करण्याची सूचना मत्स्यव्यवसाय विभागाने स्थानिक मच्छीमार सोसायट्यांना केल्याचे ते म्हणाले. सोमवारपर्यंत हवामान व्यवस्थित होईल असा अंदाज आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प; ठाणे- कल्याण मार्गावर विशेष लोकल