आ. अनिकेत तटकरेंच्या हस्ते लोकार्पण

रोहा : रोहे तालुक्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या रोटरी क्लब रोहा सेंट्रल तर्फे उपजिल्हा रुग्णालय रोहाला सद्य परिस्थितीत असलेली गरज लक्षात घेता रविवारी सायंकाळी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे दोन संच भेट देण्यात आले सदर संचांचे आ. अनिकेत तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

रोटरी क्लब रोहा सेंट्रलचे विद्यमान प्रेसिडेंट महेंद्र दिवेकर यांच्या विशेष पुढाकारातून कोरोना बाधीत रुग्णांना अत्यंत उपयोगी पडेल अशी सेवा क्लबच्या माध्यमातून प्रदान करण्यात आली. या संचांची एकूण किंमत एक लक्ष तिस हजार इतकी असल्याचे श्री. महेंद्र दिवेकर यांनी यावेळी सांगितले.

उपजिल्हा रुग्णालयाला ही सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी आर्थिक योगदान देणेसंबंधी क्लब प्रेसिडेंट महेंद्र दिवेकर यांनी रोह्यातील नागरिकांना आवाहन केले होते त्यांनी दिलेल्या आर्थिक योगदानामुळे हा उपक्रम करणे शक्य झाल्याचे क्लब तर्फे सांगण्यात आले.

कोरोना बाधीत रुग्णांमध्ये ऑक्सिजन पातळी कमी होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आढळून येते, ऑक्सिजन पातळी कमी झाल्यामुळे अनेक रुग्णांना खुप त्रास होतो अशा रुग्णांसाठी हॆ मशीन अत्यंत उपयोगी पडेल असे उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षक डॉ. अंकिता खैरकर यांनी सांगितले.
ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर हे मशीन स्वतः ऑक्सिजन बनवून रुग्णाला देते त्यामुळे या मशीन ला ऑक्सिजन सिलेंडर ची आवश्यकता नसल्याने ह्या दोन्ही मशीनचा उपयोग कोरोना पीडित रुग्णांना खूप मोठ्या प्रमाणात होणार आहॆ.

आ. अनिकेत तटकरे यांनी उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे ही सेवा उपलब्ध करुन दिल्याबद्दल रोटरी क्लब रोहा सेंट्रलचे विशेष कौतुक करुन धन्यवाद दिले.यावेळी आ.अनिकेत तटकरे यांच्या समवेत रोह्याचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, नगरसेवक महेश कोलाटकर,महेंद्र गुजर, दिवेश जैन, युवा कार्यकर्ते रविंद्र चाळके, बाबु साळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर मशीनचे लोकार्पण करतांना रोटरी क्लब रोहा सेंट्रल अध्यक्ष महेंद्र दिवेकर, सेक्रेटरी सुचित पाटील, डिस्ट्रिक्ट कल्चरल हेड राकेश कागडा, डिस्ट्रिक्ट एएजी गणेश सरदार, चार्टर्ड सेक्रेटरी रूपेश पाटील, क्लब डायरेक्टर निखिल दाते, अशोक प्रजापती, सचिन कदम, डॉ. प्रथमेश बुधे,मनोज बोराणा,दीपक सिंग, रूपेश कर्णेकर,किरण लांडगे आदी उपस्थित होते.

खारघरमध्ये एटीएम तोडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अल्पवयीन मुलाला अटक