हॉटेल अथवा मिठाई विक्रेत्यांना दि. 1 ऑक्टोबर 20 पासून ते खुल्या स्वरूपात विक्री करीत असलेल्या मिठाई पेढा, जिलेबी, लाडू इत्यादी अन्न पदार्थ खरेदी केल्यापासून किती दिवसाच्या आत वापरावे, म्हणजेच मिठाई खाण्यास योग्य असल्याची अंतिम मुदत नमूद करणे, हे ठळकपणे नमूद करणे बंधनकारक असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) लक्ष्मण अं.दराडे यांनी स्पष्ट केले आहे.

      बऱ्याच दुकानातून छोट्या कागदी बॉक्स मधून मिठाईची विक्री केली जाते.  मात्र ही मिठाई कधीपर्यंत खाणे योग्य आहे, याचा उल्लेख नसतो.  हॉटेल अथवा मिठाई विक्रेत्यांकडून विक्री केले जाणारे गोड पदार्थ किती दिवसांपर्यंत खाणे योग्य राहू शकतात, हे ग्राहकांना न समजल्यामुळे बऱ्याच वेळा ग्राहकांकडून मिठाईचे सेवन केल्याने ग्राहकांच्या आरोग्यास अपाय होऊन अन्न विषबाधेसारखी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

   त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी अन्नसुरक्षा व मानके प्रधिकरण नवी दिल्ली यांनी दि.25 जून 2020 रोजी आदेश निर्गमित केले असून हे आदेश दि. 1 ऑक्टोबर 2020 पासून अंमलात आले आहेत.  यापुढे मिठाई किती दिवसांपर्यंत खाण्यास योग्य आहे, हे सर्व मिठाई विक्रेत्यांना जाहीर करावे लागणार आहे.  त्याचप्रमाणे ही मिठाई कधी तयार केली आहे, हे सुद्धा दुकानदार त्यांच्या दुकानात प्रदर्शित करू शकतात.

    या बाबींचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल.  जिल्ह्यातील सर्व मिठाई विक्रेत्यांनी सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन रायगड-पेण लक्ष्मण अं.दराडे यांनी केले आहे.

“माझे कुटुंब-माझी जबाबदारी”बक्षीस योजनेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदविण्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरींचे आवाहन