महाराष्ट्रात पावसाचा अंदाज: परतीचा पाऊस अद्यापही पडत असून आता पुढील तीन ते चार तासांत राज्यातील काही भागांत जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्र हवामान अंदाज आणि चेतावणी:
परतीचा पाऊस ऑक्टोबर महिन्यात राज्यातील विविध भागांत जोरदार पडला. अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली होती. या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर आता राज्यातील काही भागांत पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील मराठवाडा , दक्षिण-मध्य महाराष्ट्र , रायगड आणि पुणे परिसरात पुढील ३ ते ४ तासांत जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील विविध भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच घरांची पडझड झाली आहे, रस्ते, पुलांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असून बळीराजाला लवकरात लवकर मदत पोहोचवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे.
गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी म्हणजेच कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.