मालवण (सिंधुदुर्ग) – सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्ष स्वागताच्या निमित्ताने येथील पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी राज्यासह देशातील विविध राज्यातील पर्यटकांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याने पर्यटन बहरल्याचे दिसून आले; मात्र पर्यटकांनी खर्च करताना हात आखडता घेतल्याने साहसी जलक्रीडा प्रकार वगळता अन्य प्रकारच्या पर्यटन व्यावसायिकांचा म्हणावा तसा व्यवसाय झाला नसल्याचे दिसून आले. एकंदरीत कोरोना संकटानंतर पर्यटन बहरले असले तरी अर्थकारण फारसे तेजीत आल्याचे चित्र नाही.
कोरोनामुळे गतवर्षीच्या पर्यटन हंगामावर मोठा परिणाम झाला होता. यात नोव्हेंबरमध्ये राज्याने पर्यटन खुले केल्याने जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय उभारी घेईल, असे चित्र निर्माण झाले होते. पर्यटन खुले झाल्यानंतर जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांवर पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरवात केली.
कोरोना महामारीनंतर पर्यटन व्यवसायात उभारी घेणे हे मोठे आव्हान पर्यटन व्यावसायिकांसमोर होते. त्यामुळे त्याला पर्यटन व्यावसायिक कसे सामोरे जातात यावरच सर्व अवलंबून होते. हे नवीन आव्हान स्वीकारताना पर्यटन व्यावसायिकांना मानसिकतेत बदल करण्याची गरज निर्माण झाली होती. त्यानुसार अनेक पर्यटन व्यावसायिकांनी हे आव्हान स्वीकारत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार आवश्यक ती खबरदारी घेण्यास सुरवातही केली.
डिसेंबरमध्ये जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याचे दिसून आले. नाताळ आणि इयर एंडिंगमुळे पर्यटन व्यवसाय बहरेल यादृष्टीने पर्यटन व्यावसायिक पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते. डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या पर्यटकांमुळे जिल्हा गजबजून गेला. पर्यटकांची जास्त पसंती ही किनारपट्टी भागाकडे असल्याचे या काळात दिसून आले. मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाल्याने पर्यटन व्यवसायात तेजी येईल, अशी अपेक्षा पर्यटन व्यावसायिक बाळगून होते; मात्र त्यांची यात साफ निराशा झाल्याचे दिसून आले.
मोठ्या प्रमाणात पर्यटक आले खरे; मात्र पर्यटक खर्च करताना हात आखडता घेत असल्याने त्याचा मोठा फटका निवासाची व्यवस्था करणाऱ्या पर्यटन व्यावसायिकांना बसल्याचे दिसून आले. पर्यटकांची जास्त पसंती ही किनारपट्टी भागात वास्तव्याची असल्याने या भागातील निवास व्यवस्थाधारकांना निवासाच्या एसी, नॉन एसीच्या दरात 50 टक्क्यांपर्यंत घसरण करावी लागली. म्हणजेच पर्यटन हंगामात एसी, नॉन एसीचे दर जे 2500 ते 2800 च्या घरात असायचे ते दर 1200 ते 1800 रूपयांपर्यत घसरले.
परिणामी याचा फटका निवास व्यवस्था पर्यटन व्यावसायिकांना बसल्याचे दिसून आले. तालुक्याचा विचार करता तारकर्ली, देवबाग या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले; मात्र पर्यटकांकडून कमी दरात निवास व्यवस्थेची मागणी होऊ लागल्याने व्यावसायिकांना आपले दर 50 टक्क्यापर्यंत कमी करावे लागले. यात उच्च दर्जाच्या पर्यटकांना निवास व्यवस्थेसाठी 3500 ते 4000 रुपये मोजावे लागले.
ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला हा पर्यटकांचा खास आकर्षण आहे. पर्यटन खुले झाल्यानंतर नोव्हेंबरमध्ये 42 हजार 561 जणांनी किल्ल्यास भेट दिली. डिसेंबरमध्ये 45 हजार 28 पर्यटकांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिल्याची नोंद बंदर कार्यालयात झाली आहे. यात बंदर जेटी व दांडी येथून पर्यटकांना किल्ले दर्शनाची सुविधा उपलब्ध झाली. गेल्या काही वर्षाच्या तुलनेत डिसेंबरमध्ये किल्ले सिंधुदुर्गला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्याही या हंगामात रोडावल्याचे दिसून आले.
मासळीचा आस्वाद
या हंगामात मासळीच्या दरात चढ उतार राहिला. पापलेट 1200 रुपये किलो, मोरी 450 रुपये किलो, खाडीतले खेकडे 1 हजार रुपये किलो, समुद्री खेकडे 750 रुपये टोपली, सुरमई 750 ते 800 रुपये किलो, कोळंबी 650 रुपये किलो, सवंदळा 700 ते 800 रुपये किलो, सरंगा 650 रुपये या किलो दराने उपलब्ध होते.
..तरीही मासळीवर ताव
मासळीच्या दरात चढ उतार असल्याने हॉटेलमधील मत्स्याहारी थाळ्यांच्या दरातही चढ उतार पहावयास मिळाला. यात पापलेट थाळी 450 ते 500 रुपये, सुरमई थाळी 350 ते 550 रुपये, कोळंबी थाळी 400 रुपये, बांगडा थाळी 250 रुपये, मोरी थाळी 350 रुपये, हलवा 400 रुपये, खेकडा थाळी 400 रुपये असा दर होता. पर्यटकांकडून या मासळीचा आस्वाद लुटला जात असल्याचे दिसून आले.
खर्चाला असाही आखडता हात
पर्यटकांकडून खर्च करताना आखडता हात घेतला जात असल्याने राज्याच्या अनेक भागातून येणारा पर्यटकांचा समूह हा जेवण बनविण्याचे सर्व साहित्य घेऊन येथील पर्यटनाचा आनंद लुटताना यावेळी दिसून आला. यात बरेच पर्यटक हे मासळी मंडईतून मासळीची खरेदी करून ते स्वतः किंवा स्थानिकांकडून जेवण बनवून घेत असल्याचे चित्रही दिसून आले. यामुळे हॉटेल व्यवसायावरही याचा परिणाम झाल्याचे दिसून आले.
जलक्रीडांना प्रतिसाद
कोरोनामुळे पर्यटकांनी खर्चावर मर्यादा घालून घेतल्याचे या पर्यटन हंगामात दिसून आले. यात मोठा फटका निवास व्यवस्थेला बसला; मात्र जलक्रीडा, साहसी क्रीडा प्रकारांचा आनंद लुटताना पर्यटक चांगले पैसे मोजताना दिसून आले. त्यामुळे जलक्रीडा व्यावसायिकांचा चांगला व्यवसाय झाल्याचे दिसून आले. तारकर्ली, देवबाग, दांडी, बंदर जेटी, चिवला बीचसह अन्य भागात जलक्रीडांना गर्दी होती.
किल्ले, मंदिरांना पसंती
सिंधुदुर्ग किल्ला, जयगणेश मंदिर, किल्ले सिंधुदुर्गसह शहरातील रॉकगार्डनलाही हजारो पर्यटकांनी भेट दिली. रॉकगार्डनमध्ये पर्यटकांसाठी म्युझिकल फाउंटनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याचा आनंद राज्यासह अन्य भागातील हजारो पर्यटकांनी लुटल्याचे दिसून आले. रॉकगार्डनला रोज शेकडो पर्यटक भेट देत असल्याने या भागातील पर्यटन व्यवसायही तेजीत असल्याचे दिसून आले.
संपादन – राहुल पाटील