कणकवली (सिंधुदुर्ग) : कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम ७२ टक्‍के पूर्ण झाले आहे. जून २०२१ अखेरपासून रोहा ते ठोकूर या ४४० किलोमीटर लांबीच्या मार्गावरून रेल्वे गाड्या विजेवर धावण्याचे नियोजन कोकण रेल्वेतर्फे केले आहे.

रोहा ते रत्नागिरी हा विद्युतीकरणाचा टप्पा पूर्ण झाला आहे आणि बिजूर ते ठोकूर या टप्प्यातील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. यात बिजूर ते ठोकूर टप्प्याच्या कामाची सुरक्षा तपासणी पूर्ण झाली आहे. तर रोहा ते रत्नागिरी या टप्प्याची सुरक्षा मानक तपासणी अद्याप व्हायची आहे. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर रोहा ते रत्नागिरी या मार्गावर विजेवर गाड्या 
धावणार आहेत.

रत्नागिरी ते बिजूर या टप्प्यात ठिकठिकाणी काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. यात कणकवली रेल्वे स्थानकापर्यंत विद्युत खांब उभारणीचे काम पूर्ण होत आले आहे. तर त्यापुढील टप्प्याचे काम वेगाने सुरू आहे. एप्रिल अखेरपर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण होईल. त्यानंतर सुरक्षा तपासणी, यात आलेल्या त्रुटी दूर करून जूनपासून सर्व रेल्वे गाड्या विजेवर धावतील, अशी माहिती कोकण रेल्वे सूत्रांकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा- वेगवान वाऱ्यामुळे छोट्या मच्छीमारांना समुद्रात जाऊन मासेमारी करता येत नाही

कोकण रेल्वे मार्गावरील सर्व गाड्या विजेवर धावू लागल्यानंतर कोकण रेल्वेच्या इंधनखर्चात सुमारे २०० कोटी रुपयांची बचत होणार आहे. विद्युतीकरण कामाचा ठेका लार्सन ॲण्ड टूब्रो या कंपनीने घेतला असून ४४० किलोमिटर लांबीच्या विद्युतीकरणासाठी सुमारे ११०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. तर आत्तापर्यंत ४७५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. 
कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरणासाठी खारेपाटण, कणकवली, थिवीम तसेच रत्नागिरी माणगांव, कळंबणी आणि आरवली या स्थानका परिसरात विद्युत सबस्टेशन उभारली जात आहेत.

संपादन- अर्चना बनगे

Source