वैभववाडी (सिंधुदुर्ग) – मल्चिंग, ठिबक सिंचनचा वापर करीत तिथवली येथील गुलझार निजाम काझी या प्रयोगशील तरूण शेतकऱ्याने सलग दुसऱ्या वर्षी स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. त्याने यावर्षी लागवड केलेल्या 1 हजार 200 रोपांमधून आता उत्पादन सुरू झाले असून कोकणातील लाल मातीतील स्ट्रॉबेरीची चव जिल्हावासीयांना चाखता येणार आहे. एवढेच नव्हे उपलब्ध स्ट्रॉबेरीच्या झाडांपासून रोपनिर्मीतीचे तंत्र देखील त्यांनी अवगत केले आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी रोपे उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. 

थंड हवेच्या ठिकाणी अर्थात महाबळेश्‍वर आणि तत्सम भागात स्ट्रॉबेरीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घेतले जाते; परंतु कोकणात स्ट्रॉबेरीची लागवड करण्यास फारसे कुणी धजावत नाही. यावर्षी किर्लोस विज्ञान केंद्राने आवळ्याचे झाडांमध्ये स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड केली आहे. त्यांचा हा पहिलाच प्रयोग यशस्वीतेच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे; परंतु तशाच पद्धतीचा प्रयोग तिथवली येथील काझी यांनी गेल्यावर्षीपासून सुरू केला आहे.

गेल्यावर्षी स्ट्रॉबेरीच्या 400 रोपांची लागवड श्री. काझी यांनी केली होती. प्रयोग म्हणून त्यांनी ही लागवड केली होती. त्यातून त्यांना सात ते आठ हजाराचे उत्पन्न मिळाले होते. पहिला प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आपल्या जमिनीतही स्ट्रॉबेरी होऊ शकते याचा त्यांना अंदाज आला. त्यामुळे त्यांनी यावर्षी रोपांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला. यावर्षी त्यांनी 1 हजार 200 रोपे सातारा जिल्ह्यातील वाई येथुन आणली.

वाहतुकीसह प्रतिरोप 9 रूपये दराने त्यांना रोपे मिळाली. मल्चिंग, ठिबक सिंचनचा वापर करीत त्यांनी या रोपांची 17 नोव्हेंबरला लागवड केली. खत व्यवस्थापन, पाण्याचे योग्य नियोजन आणि कीडरोगांवर कटाक्षाने त्यांनी कटाक्षाने नजर ठेवत सुक्ष्म नियोजन केले. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून स्ट्रॉबेरीचे उत्पादन सुरू झाले आहे. आतापर्यंत दोन ते तीन किलो उत्पादन त्यांना मिळाले आहे. पुढील तीन ते चार महिने स्ट्रॉबेरीचा हंगाम चालेल. त्यातून त्यांना सरासरी 500 किलोपर्यंत उत्पादन मिळून सरासरी प्रतिकिलो 200 रूपये दर मिळेल, अशी अपेक्षा त्यांना आहे. 

कोकणचे वातावरण पुरक 
कोकणातील तरूण शेतीत रमत नाही. कोकणातील वातावरण शेतीला पुरक नाही, असे सतत ऐकायला मिळते; परंतु कोकणातील जमिनीचा पोत, पाणी, हवामान शेतीला पोषक आहेच; परंतु त्याचबरोबर येथील तरूण नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून शेतीत वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. प्रयोगशील शेतकरी काझी यांनी हे तिथवलीत सिद्ध करून दाखविले आहे. 

आंबा, काजुसोबत उत्पन्न 
श्री. काझी यांची आंबा, काजूची दोनशे ते अडीचशे उत्पादनक्षम झाले आहेत. विशेष म्हणजे ते सेंद्रीय पद्धतीने उत्पादन घेतात. आंबा, काजूसोबतच हंगामी कलिंगड, भाजीपाला अशी पिके घेतात. याशिवाय हळद लागवडीसाठी त्यांनी अनेक शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचे काम केले आहे. 

संपादन – राहुल पाटील

Source