जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील करोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध असलेल्या पेण-डोलवी येथील जे.एस.डब्ल्यू कंपनी या ठिकाणी सर्व सुविधायुक्त अद्ययावत जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करणेबाबत मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी विनंती केली होती. त्यानुषंगाने ही विनंती तात्काळ मान्य करीत याबाबतचे आदेश शासनाकडून निर्गमित करण्यात आले आहेत.

               जिंदाल गृपचे संचालक श्री.सज्जन जिंदाल यांनी देखील कोविड केअर सेंटरसाठी आवश्यक ते सर्व प्रकारचे सहकार्य करण्याच्या सूचना येथील कंपनी प्रशासनास दिल्या आहेत.

             आज सकाळी या ठिकाणी पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी प्रत्यक्ष भेट देवून माहिती घेतली व संबंधितांना आवश्यक त्या सूचनाही केल्या. जवळपास 700 ते 800 बेडस् चे आरोग्यविषयक सर्व सुविधायुक्त हे जम्बो कोविड केअर सेंटर सुरू होऊन नागरिकांना आरोग्यसंबंधी  सर्व सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

               यावेळी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव व स्थानिक प्रशासनातील इतर अधिकारी तसेच जेएसडब्ल्यू कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.