
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आसपासच्या भागात होणारा अनियोजित विकास रोखण्यासाठी सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आसपासच्या ३७१ चौरस किलोमीटर क्षेत्राचा विकास आणि रायगडमधील १७५ खेड्यांचा समावेश असलेल्या नैना प्रकल्प प्रस्तावित केला आहे.
प्रकल्पांतर्गत प्रस्तावित ११ नगररचना योजनांपैकी १ ते ३ योजना वेगवेगळ्या स्तरावर राबविल्या जात आहेत, तर सिडकोने योजनेच्या अंतर्गत ४ ते ११ योजनेच्या भूमि मालकांना विकासाला प्राधान्य देण्यासाठी लवकरात लवकर आपली संमतीपत्रे सादर करण्याचे आवाहन केले आहे.
सिडकोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी म्हणाले, “सिडकोचे लक्ष्य नैना शहर विकास योजनेच्या वेगवान आणि पारदर्शक विकासाचे आहे. जमीन मालकांच्या सहभागाने आणि सहकार्याने हा प्रकल्प नगरविकास क्षेत्रात अनोखा ठरणार आहे. ”
नैना अंतर्गत नगर विकास आराखड्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ते जमीन संपादनाऐवजी सहभागात्मक आधारे विकसित केले जाईल. या योजनेंतर्गत जमीन मालक समान जमिनीचे योगदान देतील. कोणत्याही आरक्षणामुळे प्रभावित झाल्यास त्यांना त्यांच्या मूळ जमीनीतून ४०% विकसित भूखंड मिळतील आणि चटई क्षेत्र देखील मूळ जागेसारखेच असेल. अशा प्रकारे जमीन मालकांना त्यांच्या जमिनीवर संपूर्ण परतावा मिळेल. सिडको उर्वरित ६०% जागेवर रस्ते, क्रीडांगण, शाळा, उद्याने, वाढीची केंद्रे आणि इतर सुविधा विकसित करेल.