नवी मुंबई विमानतळाला दि.बां. पाटील यांचे नाव देण्यासाठी भूमिपुत्रांच्या यल्गार!

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बां. पाटील यांचेच नाव देण्यात यावे, या मागणीसाठी आज बेलापूर येथे सिडको कार्यालयावर घेराव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात स्थानिक भूमिपूत्र, प्रकल्पग्रस्त तसेच विविध राजकीय पक्ष, संस्था, संघटनांनी सहभाग घेऊन ‘जय दिबां’ असा यल्गार केला. ‘दि. बां. पाटील सोडून दुसरे कोणतेही नाव दिले तर १९८४ पेक्षा मोठे आंदोलन होईल, असा इशारा सिडको आणि राज्य सरकारला देण्यात आला असून यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता.

लोकनेते दि.बां.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्यावतीने आज २४ जून २०२१ रोजी लाखो आंदोलकांच्या साक्षीने सिडको आणि राज्य सरकारला १५ ऑगस्ट पर्यंत वेळ दिला असून जर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव नाही दिले गेले तर १६ ऑगस्ट पासून विमानतळाची सर्व काम कामे बंद पाडण्यात येतील असा इशारा देण्यात आला आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी २००८ पासून सुरु असून त्याचा कुठलाही विचार न करता मुख्यमंत्र्यांनी आपलाच हट्ट पुढे केला. मात्र कोणत्याही परिस्थिती मध्ये ‘दिबां’च्या नावासाठी आम्ही माघार घेणार नाही, असा निर्धार सर्वपक्षीय कृती समितीने व्यक्त केला आहे.

कृती समितीच्या शिष्टमंडळा सोबत झालेल्या बैठकीमध्ये काहीही ऐकून न घेता, चर्चा न करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीतून निघून गेल्याने सर्वपक्षीय कृती समितीने २४ जूनचे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत करणारच, असा निर्धार केला होता आणि नक्कीच आज जमलेल्या लाखो भूमिपुत्रांनी त्यांची लोकनेते दि.बा. पाटील यांच्याबद्दलची अस्मिता दाखवून दिली आहे.

कृती समितीच्या शिष्टमंडळाने सिडको व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणासंदर्भात केलेला ठराव रद्द करावा आणि लोकनेते दि.बां. पाटील यांच्या नावाने नवीन ठराव करावा, अशा प्रकारची मागणी केली आहे.